वैजापूर, (प्रतिनिधी) : जिल्हा न्यायालयाचे जाती वॉरंट बजावण्यासाठी आलेल्या बेलीफच्या हातातील कागदपत्रे फाडून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी वैजापूर न्यायालयाने सतीश भानुदास वाणी (वय ३२, रा. पाटील गल्ली) यास दोन वर्षे सक्तमजुरी आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त कारावासाचे आदेश न्यायाधीश एल.जी. पाछे यांनी गुरुवारी (ता. १४) दिले. ७ जानेवारी २०१६ रोजी दिवाणी न्यायालयाचे मुख्य बेलीफ अनिल बिडवई आरोपीच्या घरी वॉरंट बजावण्यासाठी गेले होते. तेव्हा आरोपीने वॉरंट हिसकावून फाडून टाकले आणि शिवीगाळ केली. याप्रकरणी बिडवई यांनी दिलेल्या प्रथम खबरी अहवालावरून वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सत्र न्यायालयात सरकारी पक्षातर्फे अॅड. गजानन मंझा आणि अॅड. कृष्णा गंडे यांनी काम पाहिले. दोन्ही बाजूंचे साक्ष-पुरावे तपासल्यानंतर न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले. ग्रेड पोलिस उपनिरीक्षक आर. आर. जाधव यांनी तपास केला, तर व्ही.ए. जाधव यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले.